देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात
येत्या शनिवारपासून देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी केंद्रसरकारनं विशेष माहिती जारी केली असून त्यात लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यापैकी आणखीन काही प्रश्नांची उत्तरं आज समजावून घेऊ.
लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? लसीकरणासाठी आधारकार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, बँकेचं किंवा पोस्टाचं पासबुक, पारपत्र, निवृत्तीवेतनासंदर्भातली कागदपत्रं, आरोग्य विमा-स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड यापैकी एक कागदपत्र आपल्या छायाचित्रासह नोंदणीच्या वेळी सादर करावं लागेल. आमदारांनी दिलेलं ओळखपत्र तसंच केंद्र, राज्यसरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांनी दिलेलं ओळखपत्रंही ग्राह्य धरलं जाईल.
नोंदणीशिवाय एखाद्या व्यक्तीला लस घेता येईल का? या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट ‘नाही’ असं आहे, कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी नोंदणी अनिवार्य आहे.
नोंदणी केल्यावरच लस घेण्याचं ठिकाण आणि वेळ याची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे. कोरोनाची लस घेतल्यानं नपुसंकत्व येईल, असाही एक गैरसमज ऐकवात येतो. औषध निर्माण शास्त्राचे अभ्यासक डॉ. ओमप्रकाश गट्टाणी यांनी हा गैरसमज दूर केला आहे.
