उरणमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ८ सरपंच विजयी, भाजपाचे ५ , काँग्रेस ३ तर शेकापचे २ सरपंच विजयी
उरण, दि. २१(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल मंगळवारी जाहीर झाला असून, शिवसेना ठाकरे गटाचे ८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. रानसई या आदिवासी बांधवांच्या ग्रामपंचायतीवर भाजपाने एकहाती सत्ता संपादित करुन तालुक्यातील एकूण ५ ग्रामपंचायतींवर भाजपा चे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. काँग्रस पक्षाचे ३ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले असून शेकापला २ सरपंच पदावर समाधान मानावे लागले आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या १८ डिसेंबर रोजी पार पडल्या, मात्र यामध्ये घारापुरी ग्रामपंचायतीची निवडणूक ही बिनविरोध झाल्याने या जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील ग्रामपंचायतीवर या अगोदर शिवसेना ठाकरे गटाने आपला झेंडा फडकावला होता. त्यामुळे उर्वरित जसखार, भेंडखळ, नवघर, पागोटे,
करळ, पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, धुतूम, चिर्ले, बोकडविरा, पाणजे, डोंगरी, नवीनशेवा, रानसई आणि कळंबुसरे या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका या १८ डिसेंबर रोजी पार पडल्या त्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निकाल हा उरण येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काल २० डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी जाहीर केला आहे.
यामध्ये रानसई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात शिवसेना ठाकरे गटांमध्ये सरळ चुरशीची लढत झाली. त्यामध्ये भाजपाच्या सरपंच पदाच्या उमेदवार राधा मधुकर पारधी यांना ४९२ मते मिळवत शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी काळूराम पारधी यांचा पराभव केला असून ग्रामपंचायतीचे सहा सदस्य निवडून आणत भाजपाने एक हाती सत्ता संपादित केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार रोहिणी काळूराम पारधी यांना ३२९ मते मिळाली. जसखार ग्रामपंचायतीच्या शिवसेना ठाकरे गट – भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार काशिबाई हसुराम ठाकूर यांना ९२८ मते मिळाली (विजयी) तर पक्ष विरहित युवा गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजुळा ठाकूर यांना ८८४ मते मिळाली. नवीन शेवा ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सोनल निलेश घरत यांना ८८० मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार चेतना घरत यांना २८६ मते मिळाली आहेत.
पाणजे ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीच्या उमेदवार लखपती हसुराम पाटील यांना ४२९ मते मिळाली (विजयी) तर शेकाप सरपंच पदाचे पराजित उमेदवार रोहन महादेव भोईर यांना ४०० मते मिळाली आहेत. पागोटे ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट – शेकाप सरपंच पदाचे उमेदवार कुणाल पाटील यांना ६९५ मते मिळाली (विजयी) तर भाजपचे सरपंच पदाचे पराजित उमेदवार जितेंद्र पाटील यांना ३७३ मते मिळाली आहेत. कळंबुसर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गट-शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार उर्मिला निनाद नाईक यांना ९३८ मते मिळाली (विजयी) तर भाजपा सरपंच पदाच्या पराजित उमेदवार सरिता रत्नदीप नाईक यांना ५३० मते मिळाली आहेत. नवघर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार सविता नितीन मढवी यांना १०२५ मते मिळाली (विजयी) तर भाजपाच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार शालिनी गणेश वाजेकर यांना ९७२ मिळाली आहेत.
भेंडखळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार मंजिता मिलिंद पाटील यांना ७९९ मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस-शेकाप आघाडीच्या सरपंच पदाच्या पराजित उमेदवार योगिता योगेश ठाकूर यांना ७०१ मते मिळाली आहेत. करळ ग्रामपंचायत मध्ये भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार अनिता अरविंद तांडेल यांना ३५५ मते मिळाली (विजयी) तर दर्शना नितीन तांडेल यांना ३४४ मते घेऊन पराजित झाल्या आहेत. डोंगरी ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या सरपंच पदाचे उमेदवार संकेत दिलीप घरत यांना ५४६ मते मिळाली (विजयी), तर शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच पदावर न पोहोचलेले उमेदवार निलेश नरेश घरत यांना ५४२ मते मिळून निसटता पराभव पत्करावा लागला आहे.
सारडे ग्रामपंचायत मध्ये भाजपा सरपंच पदाचे उमेदवार रोशन पांडुरंग पाटील यांना ५७९ मते मिळाली (विजयी) तर शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार चंद्रकांत राजाराम पाटील यांना ३४४ मते मिळाली. पुनाडे ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार निलेश अनंत कातकरी यांना ४५८ मते मिळाली (विजयी) तर भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे पराभूत उमेदवार सत्यवान कातकरी यांना ३८६ मते मिळाली आहेत. पिरकोन काँग्रेस-भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार कलावंती काशिनाथ पाटील यांना १३९९ मते मिळाली (विजयी) तर शेकाप युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार संगिता प्रशांत म्हात्रे यांना १२९४ मते मिळून पराभव झाला आहे.
धुतूम ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस-शिवसेना युतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांना ९४० मते मिळाली (विजयी) तर शेकाप-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार सिमा कांती ठाकूर यांना ६०९ मते मिळाली. चिर्ले ग्रामपंचायतीमध्ये शेकाप सरपंच पदाचे उमेदवार सुधाकर उर्फ काका भाऊ पाटील यांना १३२१ मते मिळाली (विजयी) तर काँग्रेस – भाजपा आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विनोद राम पाटील यांना १०७१ मते मिळाली. बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये शेकाप सरपंच पदाच्या उमेदवार अर्पणा मनोज पाटील यांना ८२९ मते मिळाली (विजयी) तर आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार रोहन महादेव भोईर यांना ४०० मतांवर समाधान मानावे लागले असून मोठा पराभव सहन करावा लागला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पाणजे ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दोघा उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने लहान मुलीच्या हातून चिठ्ठी काढून उमेदवार विजयी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. तर मत मोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता.
