मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद आले सेफ मोड मध्ये; येत्या २१ तारखेला होणार विधानपरिषदेच्या निवडणुका
राज्य विधानसभेच्या ९ जागांसाठी येत्या २१ तारखेला निवडणुका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज ही घोषणा केली. येत्या सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे. मतदान झाल्यानंतर त्वरीत मतमोजणीला सुरवात होईल. काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतविनंती केली होती.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळाचं सदस्यत्व येत्या २७ मे पर्यंत मिळवणं भाग आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्याआधी घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. प्रवासबंदीमुळे अमेरिकेत अडकलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक या संदर्भात घेतली. लॉकडाऊनच्या दिशानिर्देशांचं पालन करण्याचं बंधन घालून निवडणूक घेण्याचा निर्णय यावेळी झाला.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर विधिमंडळाच्या दोन पैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं नियमानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर निवडून येण्याचा पर्याय खुला झाला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.
Source – AIR
