मुंबई, दि. २६ : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादनही केले.
कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.
घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन
राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले.
आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
