पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे
मुंबई दि. २१: पेट्रोल आणि डिजेल वरील केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या ट्वीटर संदेशात दिली. त्यानुसार पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी कपात केली जाणार आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे.
पुढे ते म्हणाले की केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.
