धक्कादायक! अवैधरीत्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक
मुंबई, दि.७: मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अवैधरीत्या युरेनियमची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली असून, यापैकी एक जण मानखुर्दचा तर दुसरा ठाण्याचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून ७ किलो १०० ग्रॅम नैसर्गिक युरेनियम जप्त करण्यात आलं आहे. याची बाजारपेठेतली किंमत सुमारे २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे.
अशाप्रकारे परवान्याशिवाय युरेनियम बाळगणे हा गुन्हा आहे. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञांनी आकाशवाणीला दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेलं युरेनियम हे नैसर्गिक स्वरुपात असल्यामुळे ते फारसा किरणोत्सर्ग करत नाही आणि परिणामी फार धोकादायकही नाही. मात्र ही गंभीर बाब असून पोलिस यामागील प्रमुख व्यक्तिंना शोधून काढतील, अशी अपेक्षा या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
