धुतुम ते सुरुंगपाडा NH4B वर पारंपरिक रस्त्यावर नवीन बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची वैजनाथ ठाकूर यांची मागणी
उरण, दि.१४(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील धुतुम ते सुरुंगपाडा NH 4 B मार्गावर पारंपरिक रस्त्यावर नवीन बोगद्याचे(Underpass) काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर तसेच धुतुम ग्रामपंचायत, जासई ग्रामपंचायतने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग NH 4 B, टी पॉइंट पनवेल यांच्याकडे वारंवार लेखी स्वरूपात केली होती. त्या संदर्भात टीआयपीएल कंपनीचे भरणीकुमार व कुलकर्णी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी या जागेची पाहणी केली. त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रशांत फेगडे यांनी होणाऱ्या वाहतूक कोंडी व अपघात आदि संदर्भात तात्काळ समस्येचे निराकरण करून त्याठिकाणी नवीन बोगदाचे(Underpass) काम लवकरात लवकर वरिष्ठांकडून कामाची मंजुरी घेऊन सुरू करू असे धुतुम ग्रामस्थांना आश्वासित केले होते. असे असताना देखील धुतुम ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
धुतूम ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार सदर जागेवर सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घाट मांडला आहे. धुतुम गावची लोकसंख्या ४००० आहे. बाजारासाठी कामाच्या निमित्ताने नागरिक ये-जा करीत असतात. जासई हायस्कूल व कॉलेजला जाण्यासाठी आणि शेजारील सुरुंगपाडा गावातील मुले रा.जि.प. शाळेत जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. शिवाय आजूबाजूच्या गावातील शेकडो नागरिक कावीळ उतरण्यासाठी धुतुम गावात नेहमी ये-जा करीत असतात. सदर मार्गावर अवजड वाहनांनी धडक देऊन धुतूम गावच्या २५ ते ३० तरुणांचे बळी घेतले आहेत. तर अनेकांना अपंगत्व आले आहे. गुरे ढोरेही अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे जनतेचे, नागरिकांचे हित लक्षात घेऊन धुतुम येथील नवीन बोगद्याच्या(Underpass) कामाला लवकरात लवकर मंजूरी देऊन लवकरात लवकर काम सुरू करावे. अन्यथा धुतुम ग्रामस्थ व शेजारी गावातील नागरिक तीव्र आंदोलन करतील. होणाऱ्या परिणामास महामार्ग प्राधिकरण जबाबदार असेल असा इशारा पत्रव्यवहाराद्वारे वैजनाथ ठाकूर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिला आहे.
भविष्यात या मार्गावर व संबंधित जागेवर कोणाचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास त्याला सर्वस्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी प्रशांत फेगडे, यशवंत घोटकर, टीआयपीएलचे(TIPL) भरणी कुमार आणि कुलकर्णी हेच सर्वस्वी जबाबदार राहतील असे सांगत बोगद्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी पत्रव्यवहारद्वारे केली आहे.


