कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
उरण, दि.१४(विठ्ठल ममताबादे): कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालयातील वाणिज्य व वाणिज्य (अकाउंटिंग फायनान्स) विभागाच्या वतीने “सेवा क्षेत्र: कोरोना दरम्यान आणि कोरोना नंतरच्या काळातील आव्हाने आणि संधी” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले गेले. या परिषदेत उद्घाटनीय कार्यक्रमात प्रो. डॉ. डेव्ह ओ गोरमन (संताफे कॉलेज, फ्लोरिडा, अमेरिका) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर कोव्हिड-19 चा प्रभाव या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली व भारत आर्थिक विकासाच्या दिशेने जात असताना चीनच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा विचार करता भारताची अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे सांगितले. यावेळी मुख्य अतिथी डॉ. राजेश जयपुरकर (माजी प्र-कुलगुरू अमरावती विद्यापीठ, अमरावती) यांनी शिक्षण व्यवस्थेवर कोव्हिड-19चा झालेला परिणाम याविषयी विवेचन केले. या परिषदेत उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. व्हि. एस. इंदुलकर यांनी केले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष शिशिर दादा धारकर (उपाध्यक्ष, कोकण ज्ञानपीठ कर्जत) यांनी युवा भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. प्रा. के. ए. शामा सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. पराग कारुळकर यांनी केले.
द्वितीय सत्रात भारताच्या विविध राज्यातील एकूण १३ संशोधकांनी आपले पेपर सादर केले. या सत्राचे सन्माननीय वक्ते प्रा. डॉ. अजित कुमार (शासकीय महाविद्यालय, भिवानी, हरियाणा) हे होते. तर अध्यक्ष डॉ. एलिझाबेथ मॅथ्यूज ( सी के टी महाविद्यालय, पनवेल) या होत्या. पाहुण्यांचे स्वागत परिचय प्रा. लिप्टन कुमार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रियाज पठाण यांनी केले. तसेच या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. कु. हन्नत शेख यांनी केले. तिसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विलास कुलकर्णी (सरदार पटेल विद्यापीठ, आणंद-गुजरात) हे होते. तर अध्यक्ष प्रा. डॉ. किशोरी भगत या होत्या. या सत्रात पाहुण्यांचे स्वागत परिचय प्रा. मयुरी मढवी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एम. जी. लोणे यांनी केले. या सत्रात एकूण बारा संशोधकांनी आपले वेगळ्या विषयांवरील पेपर सादर केले. त्या परिषदेत बँकिंग, फायनान्स, आरोग्य, पर्यटन, उद्योग, विमा, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व कायदेशीर सेवा इत्यादी विविध सेवा क्षेत्रावर कोव्हिड-१९ चा झालेला परिणाम याविषयी विचारमंथन झाले.
समारोप सत्रात ई-परिषदेचे समन्वयक प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी परिषदेचे पुनरावलोकन केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी कोव्हिड -19 जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर प्रभाव पडला असताना त्यावर विचारमंथन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सहभागी पैकी प्रा. डॉ. अभिषेक चंडोला यांनी परिषदे विषयीच्या भावना व्यक्त केल्या. समारोपीय सत्राचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक रावेरकर (प्राचार्य, सुंदरराव मोरे महाविद्यालय, पोलादपूर) हे होते. तर संपूर्ण परिषदेचे आभार प्रा. एच. के. जगताप यांनी व्यक्त केली. परिषदेची तांत्रिक बाजू प्रा. डॉ. ए.आर. चव्हाण यांनी सांभाळली. परिषदेत देशाच्या विविध भागातून एकूण ५३ शोधनिबंध प्रकाशनासाठी सादर झाले. भारताच्या विविध राज्यातून २६५ विविध अभ्यासक संशोधक यांनी सदर आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला.
