चाणजे शेतकरी संघर्ष समिती हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार – अविनाश म्हात्रे
उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): विविध मागण्यांसंदर्भात सिडको कार्यालय, द्रोणागिरी येथे आमरण उपोषणा संदर्भात सिडको व्यवस्थापना सोबत झालेल्या मीटिंगमध्ये चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्या मार्गी लागण्या संदर्भात खालील निर्णय घेण्यात आले.
१) समुद्राचे पाणी व खारफुटीचे अतिक्रमण थांबवणे संदर्भात : ज्या-ज्या वेळी खारफुटी कार्यालयाकडून सिडको प्रशासनास फ्लॅप गेट काढण्याचे आदेश येतील त्या-त्या वेळी सिडको प्रशासन चाणजे शेतकरी संघर्ष समितीस कळवतील व त्याप्रमाणे सदर संघटना कारवाई करणार. तसेच फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्यासाठी चाणजे शेतकरी संघर्ष समिती सर्व बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई हायकोर्ट मध्ये जनहित याचिका (PIL) दाखल करणार आहे.
२) साकव/खारबंड सुरक्षितेसाठी हाईट गेज पूर्ववत करणे संदर्भात : दी.८/१२/२०२१ रोजी सिडकोकडून चाणजे शेतकरी संघर्ष समितीस दिलेल्या पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, आपल्या जमिनीवर असलेला साकव/खारबंड हा सिडकोने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या विनंती नुसार करंजा टर्मिनल कंपनीस हस्तांतर केला आहे, यावरून करंजा टर्मिनल, सिडको व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांचे साटेलोटे उघड झाले आहे. हा सर्व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी चाणजे शेतकरी संघर्ष समिती हायकोर्ट मध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे. तसेच सर्व पुरावे गोळा करून करंजा टर्मिनल कंपनी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याविरुद्ध स्थगित केलेले आमरण उपोषण नवीन जोशाने सुरू करण्यात येणार असल्याचे तसेच आमरण उपोषण आंदोलन तात्पुरते पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.
सिडको प्रशासनासोबत झालेल्या सभेमध्ये सिडको प्रशासनाने चाणजे शेतकरी संघर्ष समितीस सांगितले तसेच समितीस दिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, सिडकोने संबंधित साकव/खारबंड जो शेतकऱ्यांच्या जमिनीत आहे त्या जमीनी संपादित न करता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड च्या सांगण्यावरून करंजा टर्मिनल कंपनीस परस्पर हस्तांतर केला आहे. त्या अनुषंगाने संघटनेचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. आता या सर्व प्रकाराविरोधात हायकोर्ट मध्ये जनहित याचिका दाखल करण्याचे ठरले आहे. तसेच आरटीआय द्वारे काही पुरावे गोळा करून स्थगित आमरण उपोषण साकव समोर करंजा टर्मिनल कंपनी विरुद्ध करण्यात येणार आहे.
– अविनाश म्हात्रे
अध्यक्ष – चाणजे शेतकरी संघर्ष समिती
