चिंचवड येथील राष्ट्रीय कार्यशाळेत रायगड जिल्ह्यातील धुतुम ग्रामपंचायतीचा गौरव
उरण, दि २६ (विठ्ठल ममताबादे) : केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीने चिंचवड, पुणे येथे दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ते २४ सप्टेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत विकास ध्येयांच्या (SDGS) संकल्पना ध्येयांवर स्वच्छ (CLEAN) पंचायत व जलयुक्त ( WATER SUFFICIENT) पंचायत ह्या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी २८ राज्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय कार्यशाळेला महाराष्ट्र राज्यातून उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायतीला सहभाग घेण्याची सुवर्ण संधी मिळाली. धुतुम ग्रामपंचायतीने घन कचरा व्यवस्थापन (ZERO GARBAGE) प्रकल्पच्या माध्यमातून केलेल्या स्वच्छतेच्या कामाची चित्रफीत या कार्यशाळेमध्ये दाखविण्यात आली. त्याची दखल केंद्र शासनाने त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने घेतली व धुतुम ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा शरद ठाकूर, शरद धावजी ठाकूर (उपसरपंच) व सदस्यांनी केलेल्या कामाची स्तुती केली. या राष्ट्रीय कार्यशाळेला धुतूम ग्रामपंचायतीच्या वतीने विनोद कृष्णा मोरे (ग्रामसेवक) यांनी सहभाग घेतला व त्यांना या कामा करिता सन्मानित करण्यात आले. हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता आय.ओ. टि.एल. कंपनी(IOTL )चा सर्वात मोठा सहभाग लाभला तसेच रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) भालेराव, उरण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भोये, विस्तार अधिकारी (ग्रा.प) नारंगिकर यांचे मार्गदर्शन लाभले.
