उत्तर प्रदेश सरकारचा टाळेबंदीस विरोध; तर अनेक राज्यात कडक निर्बंध लागू
देश, दि. २०: निर्बंधांचा इशारा काल देण्यात आल्यानंतर पुद्दुचेरीमध्ये रात्री १० ते पहाटे ५ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. समुद्रकिनारे संध्याकाळी ५ वाजल्यापासून फिरण्यास बंद राहतील. उपाहारगृहात ८ वाजेपर्यंत बसता येणार असून त्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
केरळमध्ये दोन आठवड्यांसाठीच्या रात्रीच्या संचारबंदीला आजपासून सुरवात होत आहे. रात्री ९ ते पहाटे ५ ही संचारबंदी सुरू राहणार आहे. मात्र सार्वजनिक वाहतुकीस बंदी घालण्यात आलेली नाही.
छत्तीसगडच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी लागू झाली आहे. हिमाचल प्रदेशातही संसर्ग वाढीमुळं १ मे पर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागालँडमध्येही पुढील आदेश येईपर्यंत १ ली ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आंध्र प्रदेशमध्ये मात्र १० वी आणि १२ वीच्या परीक्षा नियोजनानुसार होणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यातल्या १ ली ते ९ वी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून या वर्गांमधल्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं सरकारी रुग्णालयांमध्ये चार हजार खाटा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून खासगी रुग्णालयांनाही खाटांची संख्या वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशात टाळेबंदी जाहीर करण्याची आवश्यकता नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. काल अलाहाबाद उच्च न्यायालयानं लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूर या पाच शहरांमध्ये टाळेबंदी जारी करण्याचे आदेश दिले होते.
आसाम मध्ये इतर राज्यातून येणाऱ्या ट्रक चालकांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तामिळनाडूमध्येही रात्रीची संचारबंदी आजपासून सुरू होत आहे. सार्वजनिक वाहतुकीत त्या प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
Source – AIR
