Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण; रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये – मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण; रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये – मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा क्षेत्रीय पातळीवर राहण्यासाठी अधिवेशन रविवारपूर्वी पूर्ण करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील ८ पुणे येथे तर दोघांना मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी, असे आवाहन करतानाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रीय स्तरावर असावे यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत दिली.

कोरोनाबाबत राज्य शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत माहिती देण्यासाठी विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ४० जणांचा समूह दुबईहून भारतात आला. त्यातील बाधा झालेल्यांपैकी १० जण आहेत. त्यातील सर्वांशी संपर्क झाला असून ३ व्यक्ती कर्नाटकच्या आहेत. या समूहातील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी घाबरुन न जाता सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी. परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींनी १४ दिवस घरामध्ये थांबावे. राज्य शासन कोरोनासंदर्भात दर दोन तासांनी आढावा घेत आहे. खासगी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. अतिशय जबाबदारीने काम करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला केंद्राच्या परवानगीनंतरच चाचणीचे काम दिले जाईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जाता यावे, त्यांना दिलासा देता यावा यासाठी अधिवेशनाचे कामकाज शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधापरिषद उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बैठकीत घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयपीएल सामने विनाप्रेक्षक खेळविण्याबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नियमाच्या अधीन राहून कामकाज पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी, अधिकारी आपआपल्या भागात राहण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. यासंदर्भात उद्या दोन्ही सभागृहात संसदीय कार्यमंत्री निवेदन करतील. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, विविध परिषदा, मेळावे, सभा आदी कार्यक्रम रद्द करावेत. पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या समूहाने त्यांच्या परतीबाबत आरोग्य यंत्रणेशी संपर्कात रहावे, असे आवाहन केले.

राज्यात विलगीकरण कक्षात ७०० खाटा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, प्रत्येक जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालये, महापालिका रुग्णालये येथेही विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महानगरातील रुग्णालयांमध्ये देखील स्वतंत्र खाटा करण्यात आल्या असून अशा प्रकारे ६५० ते ७०० खाटा उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाने डॉक्टरांना प्रशिक्षण दिले असून आज, उद्या आणि परवा प्रशिक्षित डॉक्टर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांना प्रशिक्षण देणार आहेत. रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांकरिता वैयक्तिक संरक्षण किटची उपलब्धता असून पुरेसे व्हेंटिलेटर आणि औषधे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *