प्रकरण घटनापिठाकडे नेण्याबाबत दिले संकेत
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गटा दरम्यान चालू असलेली प्रकरणे घटनापीठाकडे पाठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय सोमवार ८ ऑगस्टपर्यंत निर्णय घेऊ शकतं, असे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे. खर्या पक्षाबाबत दोन्ही गटांच्या दाव्यावर आपला निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचा सल्ला न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या आधारे उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यास आयोगाने त्यावर विचार करावा, असे न्यायालयाने आदेशात लिहिले आहे.
पक्षावरील हक्काचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांचा बंड आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांमध्ये शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवणे, राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सभागृहात नवीन अध्यक्ष निवडीची चुकीची प्रक्रिया असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली असून उद्धव ठाकरे गटाकडून उत्तर मागितले आहे.
