काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे हे जुने मित्र होते असे मी ऐकून आहे : सुमित्रा महाजन
भोपाळ: दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. यानंतर आता मावळत्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल महाजनांनी शंका उपस्थित केली.
‘हेमंत करकरे यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला म्हणून त्यांना शहीद मानले जाईल, मात्र एटीएसप्रमुख म्हणून त्याची भूमिका योग्य नव्हती’, असे विधान करत महाजन यांनी शहीद करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून घेतलेल्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि हेमंत करकरे हे जुने मित्र होते असे मी ऐकून आहे. दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना वारंवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप करायचे. संघ बॉम्ब तयार करत असल्याचा आरोप ते करायचे, असा शब्दात सुमित्रा महाजन यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला.
महाजन यांनी त्यांच्या विधानातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. महाजन यांच्या विधानाला सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘सुमित्रा ताई, तुम्ही अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरेंसोबत माझं नाव जोडत आहात, याचा मला अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया दिग्विजय सिंह यांनी दिली.
