राज्यभरातल्या सुमारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांचा बँकेच्या २ दिवसीय संपात सहभाग
राज्यभरात सुमारे दहा हजार बँक शाखांमधले ५० हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याची माहिती युनायटेड फोरम आँफ बँक आँफ युनियन्स चे समन्वयक देविदास तुळजापूरकर यांनी दिली. कोविड पार्श्वभूमीवर, धरणे अथवा मोर्चे काढले जाणार नसल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यातले सुमारे तीन हजार कर्मचारी तर परभणी जिल्ह्यातल्या १०२ बँक शाखांमधले साडे चारशे अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे बँकांचं कामकाज विस्कळीत झालं आहे. मात्र बँकेच्या नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम सुविधा सुरळीत चालू राहतील अशी माहिती संघटनेचे सचिव सुनील हट्टेकर यांनी दिली.
लातूर शहरात बँक कर्मचारी अधिकाऱ्यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन, बँक खाजगीकरणाचे अर्थव्यवस्थेवर आणि दैनंदिन जीवनावर होणारे दुष्परिणाम, याविषयी संवाद साधला. कोविड नियमाचं पालन करत, दोन-दोन च्या संख्येनं हा संवाद साधण्यात आला.
