राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. पुढील चार महिन्यांच्या आवश्यक आर्थिक खर्चाची तरतूद त्यात असेल, पण यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर सवलतींच्या काही घोषणादेखील करण्यात येतील, अशी शक्यता आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या कोरडवाहू आणि जिरायत शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याशिवाय, निवडणुकांचा हंगाम असल्यामुळे रोजगाराबाबत आणि महापुरुषांची स्मारके व पुतळ्यांबाबत भरीव निधीची तरतूद होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते.
