राज्यातील अनेक भागात एसटी सेवा प्रभावित
मुंबई, दि. ३: ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाची हाक दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या तर जिल्ह्यात कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात आणि अशावेळी हा बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यात शाळकरी मुलांचे सुद्धा मोठे हाल झाले आहेत. शासनाने तातडीने संप मिटवावा अशी मागणी होत आहे.
धुळे विभागातील वेगवेगळ्या नऊ आगारांमधील जवळपास तीन हजार कर्मचारी, कामगारांनी आजच्या बंद मध्ये सक्रिय सहभाग घेतला. गोंदिया जिल्ह्यात देखील एसटी सेवा ठप्प झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कामगार संघटनांच्या कृती समिती सोबत त्यांच्या मागण्यांबाबत बैठक घेणार आहेत. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने केले आहे.
Source – AIR
