परीक्षेविना दहावीचे विद्यार्थी उत्तीर्ण केले जाऊ शकत नाहीत – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई, दि.२१: दहावीची परिक्षा व्हायला हवी, परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केलं जाऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातल्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यांकन झालेलं नाही, आता दहावीची परिक्षा होणार नाही, तर ही संपूर्ण तुकडी योग्य मूल्यांकनाशिवाय पुढील शिक्षणासाठी बाहेर पडणार असल्याचं, याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणामधली सर्वात महत्वाची परीक्षा असून, कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणाखाली ही परीक्षा रद्द कशी काय केली, असा प्रश्न न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे.
परीक्षा रद्द करुन पुढील काहीही निर्णय अद्याप घेतला नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. सरकारने आणि सर्व शिक्षण मंडळांनीही यासंदर्भात लेखी स्वरुपात आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
