School Students
उद्यापासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्यापासून (१ मार्च) सुरू होत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, लातूर, औरंगाबाद, अमरावती आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे.
उद्या सकाळी ठीक अकरा वाजता मराठीच्या परीक्षेला सुरुवात होईल. राज्यभरातील ४ हजार ८७४ केंद्रांवर परीक्षा होईल. २२ हजार २४४ शाळांतील नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाचे मिळून १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनी, ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी, ८ हजार ८३० दिव्यांग विद्यार्थी आहेत. परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात शिक्षण मंडळातर्फे भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली.
