राष्ट्रवादि कॉंग्रेस पक्षानेही राजभवनाजवळ केली निदर्शने
पुणे, दि. २१ : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या काही टिप्पण्या आणि तुलना या विरोधात सोमवारी दुसऱ्या दिवशीही निदर्शने सुरूच होती. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्याच्या विविध भागात निदर्शने केली, तर काँग्रेसने कोश्यारी यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली. या सार्यात भारतीय जनता पक्षाने कोश्यारींचा बचाव केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
विशेष म्हणजे, औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जुन्या युगाचे प्रतीक’ संबोधले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ‘आधुनिक काळातील प्रेयरणास्थान’ म्हणून संबोधले होते. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, पूर्वी तुम्हाला तुमचा आयकॉन कोण असा प्रश्न विचारला असता, उत्तर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस किंवा महात्मा गांधी असे असायचे, पण महाराष्ट्रात तुम्हाला फार दूर पाहण्याची गरज नाही. येथे अनेक नेते आहेत. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.
राष्ट्रवादीने राजभवनाजवळ निदर्शने केली
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने राजभवनाजवळ निदर्शने केली, तर पुण्यात ८० वर्षीय कोश्यारी यांचे धोतर प्रतिकात्मकपणे फाडून पुतळा फाडण्यात आला. इतरांनी कोश्यारींच्या पोस्टरला चप्पल मारून, त्यावर काळे पेंट/शाई लावून निषेध केला. त्यांना त्यांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात पाठवण्याची मागणी आंदोलकांनी केली. राज्यातील इतर शहरांमध्येही अशीच निदर्शने करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, भाई जगताप आदींनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले.

