आता ठाकरे वि. शिंदे गटाची सुनावणी होणार ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर
नवी दिल्ली, दि. २३: शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी आता ५ न्यायाधीशांचे घटनापीठ करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे की, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत दोन्ही गटांच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने आपली कारवाई सुरू ठेवायची की काही काळासाठी स्थगित ठेवायची हे घटनापीठ आधी ठरवेल. ही सुनावणी गुरुवारी, २५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांचा बंड आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. या याचिकांमध्ये शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवणे, राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी दिलेले निमंत्रण, सभागृहात नवीन सभापती निवडीची चुकीची प्रक्रिया असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याच्या दाव्यावर निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली असून उद्धव ठाकरे गटाकडून उत्तर मागितले आहे.
आयोगाची कारवाई थांबवण्याची मागणी
हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षाच्या निवडणूक चिन्ह वाटपाबाबत निवडणूक आयोगात सुरू असलेली कार्यवाही थांबवावी, असा आग्रह धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. अशा स्थितीत त्यावर निर्णय न घेता निवडणूक आयोगाला खऱ्या पक्षाबाबत निर्णय घेण्यापासून रोखले पाहिजे.
शिंदे गटाच्या वकिलांनी केला विरोध
शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल म्हणाले की, निवडणूक आयोग पक्षाच्या निवडणूक चिन्हावर उपलब्ध तथ्यांच्या आधारे निर्णय घेतो. हे आयोगाचे घटनात्मक कार्य आहे. त्यामुळे त्याला थांबता कामा नये. यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, २ दिवसांत आभाळ फाटणार नाही. निवडणूक आयोगाने घटनापीठाच्या आदेशाची वाट पाहावी.
