आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेच्या वेळापत्रकाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडून राखीव
मुंबई, दि. २५: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरच्या याचिकेच्या वेळापत्रकाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राखून ठेवला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आज ही माहिती दिली. विधानसभा अध्यक्षांनी आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. दोन्ही वकिलांच्या संमतीने आजचा निर्णय राखून ठेवतोय, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ असं अध्यक्षांनी सांगितल्याचं शिरसाट म्हणाले. अपात्रता याचिकांवरची सुनावणी ऑनलाईन व्हावी, खुली व्हावी अशी विधाने केली जात आहेत. या विधानांवर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं शिरसाठ म्हणाले. विधानसभा अध्यक्ष लवकरच वेळापत्रक जाहीर करतील, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी दिली. या सुनावणीला शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते आपापल्या वकीलांसह हजर होते.
Source – AIR
