सपा चे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन; ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
उत्तर प्रदेश, दि. १० : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज सोमवारी दि. १० रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. १ ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यादव यांची ऑक्सिजन पातळी खाली येऊ लागली. याशिवाय त्यांना युरिन इन्फेक्शन, छातीत जंतुसंसर्ग आणि श्वास घेण्यास त्रास होत होता.
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात डॉक्टरांचे एक पथक मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार करत होते. मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी सकाळी ८.१६ वाजता अखेरचा श्वास घेतला. समाजवादी पक्षाने ट्विट करून मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची पुष्टी केली. सपाने ट्विट करून लिहिले, “माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेते राहिले नाहीत – श्री अखिलेश यादव.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाग्या केल्या आठवणी
मुलायमसिंग यादव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, पीएम मोदींनी लिहिले, “आम्ही आपापल्या राज्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम केले तेव्हा मुलायम सिंह यादव यांच्याशी माझे अनेकदा संभाषण झाले. जवळीक कायम राहिली आणि मला नेहमीच त्यांचे विचार ऐकण्याची उत्सुकता होती. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि लाखो समर्थकांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
