बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या काराभाराबाबत व्यक्त केली तीव्र नापसंती
महाराष्ट्र हे देशातलं सहावं मोठं करदाता राज्य असलं, तरी महिलांकरता शौचालयं आणि अनेक प्राथमिक सुविधाही इथं नाहीत, अशी खंत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केली. दक्षिण-मध्य मुंबईच्या लोकसभा मतदार संघातल्या दोन दिवसांच्या दौऱ्यातला आजच्या त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या काराभाराबाबत त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
महिलांसाठी पुरेशा शौचालयांची व्यवस्था नाही, तसंच शहरातली उद्यानं आणि खेळाच्या मैदांनाचीही अवस्था वाईट असून मैदानी खेळांबाबत कसलंही स्पष्ट धोरण नाही, असं ते म्हणाले. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांची दुरवस्था आहे. महापालिका अधिकाऱ्यांना त्यांनी अधिकाधिक शौचालयं बांधण्यावर भर द्यायला सांगितलं. तसंच, रस्ते आणि इतर सुविधा याकडे लक्ष पुरवायला सांगितलं. धारावी इथं कुंभारवाडा सभागृहात अनुराग ठाकूर यांनी विविध दुर्बल घटकातल्या समाजासोबत संवाद साधला आणि त्यांच्यासोबत स्नेहभोजनही केलं. देशात ७० टक्क्यांपेक्षा अधिक खेळाडू ग्रामीण भागातून आणि गरीब कुटुंबातून येतात. धारावीतलं क्रीडा संकुल श्रीमंतांसाठी मर्यादित असलं, तरी धारावीमध्ये खेळासाठी नवीन सुविधा उपलब्ध करू, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
