नवीन शेवा गावातील ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्न येत्या एका महिन्यात सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन
उरण, दि. ८(विठ्ठल ममताबादे): मंगळवार दिनांक ०७/१२/२०२१ रोजी माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या बरोबर बैठक घेऊन पुनर्वसित नवीन शेवा या गावातील ३३ हेक्टर जमिनीच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी येत्या एका महिन्यात हा प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून, लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गावठाण विस्तारांसाठी लागणारा निधी या विषयांवर जेएनपीटी चे प्रशासन, सिडको अधिकारी यांच्याशी बोलणी करून लवकरच तोडगा काढून वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीला उरण पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, सल्लागार चंद्रकांत घरत, नवीन शेवा सरपंच आदिनाथ भोईर, ग्रामसुधारणा मंडळाचे अधक्ष कमलाकर पाटील, सहखजिनदार भगवान घरत, तंटामुक्ती अध्यक्ष हेमंत म्हात्रे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरत, पी. डी. घरत, रमेश कोळी, अमित भगत व ग्रामस्थ उपस्थित होते.
