आता शिवसेना शाखा होणार दवाखाने
मुंबई: कोरोना व्हायरस ची धास्ती जशी सामान्यांनी घेतली आहे तशीच ती बऱ्याच अंशी खाजगी दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांनीही घेतली आहे. या सर्वांवर काही दिवसांपूर्वी कायद्याचा बडगा उचलण्याची तयारीही सरकारतर्फे करण्यात आली होती. पण अशा प्रकारे या डॉक्टरांवर कायद्याचा बडगा न दाखवता थोड्या माणुसकीच्या अंगाने विचार करत शिवसेनेने पक्ष म्हणून आता स्वतःच यातून मार्ग काढला आहे. येत्या काही दिवसात शिवसेना शाखा या खाजगी दवाखान्यात रूपांतरित करण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच संबंधित शाखाप्रमुखांना तसे आदेश देणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबतच्या या बैठकीत स्पष्ट केले.
काल शुक्रवारी मुंबईतील’ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक’, दादर येथे काही निवडक संपादकांच्या सोबत मुख्यमंत्र्यांनी तासभर चर्चा केली. सध्या कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची दवाखाने बंद असल्यामुळे फार मोठी गैरसोय होत आहे. या रुग्णांच्या समस्या, तसेच स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून शाखा स्तरावर दवाखाने सुरू करण्यात करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव भूषण गगराणी, विकास खर्गे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माहिती संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे आणि शिवसेना जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान उपस्थित होते.
