शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली पक्षाची भूमिका
मुंबई, दि. १२ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ते म्हणाले की, काल झालेल्या खासदारांच्या बैठकीत माझ्यावर कोणीही दबाव टाकला नाही, हे मला स्पष्ट करायचे आहे. आमच्या अनेक आदिवासी नेत्यांनी मला विनंती केली आहे की पहिल्यांदाच आदिवासी राष्ट्रपती होत आहेत. त्यामुळे शिवसेना त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर करत आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनेने अशा विषयावर कधीही राजकारण केले नाही. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे.” पुढे ते म्हणाले की, “या आधी प्रतिभा पाटील यांना आणि त्यानंतर प्रणब मुखर्जी या यूपीएच्या उमेदवारांना शिवसेनेने एनडीएपेक्षा वेगळा निर्णय घेतला होता. आताही शिवसेना तशीच वेगळी भूमिका घेत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करत आहे.”
उद्धव ठाकरेंच्या घोषणेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असे सांगितले.
