शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणी सल्लागार चेतन पाटील याला अटक; शिल्पकार अद्याप फरार
सिंधुदुर्ग, दि. ३०: सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा कोसळला व राज्यातलं राजकीय वातावरण एकदम तापलं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. या दरम्यान खरे दोषी कोण हे बाहेर आलं नसलं तरी प्राथमिक स्वरुपात आरोपी म्हणून पुतळा बनवणारे शिल्पकार जयदीप आपटे व सल्लागार चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल झाला. घटना घडल्यानंतर दोघेही फरार होते. अखेर पुतळा पडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली आहे. चेतन याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं. चेतन पाटील हा पुतळा बनवण्याचं कंत्राट दिल्या गेलेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून काम पाहात होता. या कंपनीचा मालक आणि पडलेल्या मुर्तीचा शिल्पकार जयदीप आपटे हा या प्रकरणातला दुसरा आरोपी असून, तो अद्यापही फरार आहे.
Source – AIR
