नवी मुंबईतील बेलापूर किल्ला येथे शिवजयंती साजरी करण्याचे सलग ४थे वर्ष
वाशी/बेलापूर, दि.२२: युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने नवी मुंबईतील एकमेव किल्ला असलेल्या किल्ले बेलापूर या ठिकाणी शिवजयंती सोहळा-२०२२ व त्यानिमित्ताने रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले.
नवी मुंबईला लाभलेले भाग्य म्हणजे एकमेव किल्ला व ऐतिहासिक स्थळ किल्ले बेलापूर या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती सोहळा-२०२२ आयोजित करण्यात आला होता, सोहळा आयोजित करण्याचे प्रतिष्ठानचे हे ४थे वर्ष होते.

शिवजयंती सोहळा हा गडावर घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे लोकांना किल्ला माहित होणे, किल्ल्याबद्दल नवी मुंबईकरांना जनजागृती व्हावी व यामुळे किल्ल्याला नवी संजीवनी मिळेल हा होता. सदर सोहळ्याची सुरुवात हि वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली. खाकी ट्रेनिंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्योत प्रज्वलित करून ज्योत पामबीच मार्गे किल्ले बेलापूर येथे आणण्यात आली. किल्ले बेलापूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शिवदिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या पालखी सोहळ्यात वाशी येथून आलेली ज्योत सहभागी झाली. त्याचसोबत या शिवजयंती सोहळ्यात छावा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्याक्षिके देखील दाखवण्यात आली. सदर कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेविका पुनम पाटील, माजी नगरसेवक दीपक पवार, समाजसेवक मिथुन पाटील, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, रत्नमाला विद्यामंदिर च्या संचालिका माधुरी आंबेरकर, श्री गोवर्धनी माता सेवा मंडळ चे अध्यक्ष मनोज बालम, बांधिलकी प्रतिष्ठान अध्यक्ष पल्लवी निंबाळकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याचसोबत यावर्षी शिवजयंती सोहळा-२०२२ निमित्त किल्ले बेलापूर या ठिकाणी रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. किल्ले बेलापूर याठिकाणी पहिल्यांदाच अशा पद्धतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे रक्त संकलन नवी मुंबई मधील स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या माध्यमातून करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यात विशेष मदत झाली ती श्री गोवर्धनी माता सेवा मंडळ व वाशी येथील खाकी ट्रेनिंग अकॅडेमी यांची. सदर शिवजयंती सोहळ्या दरम्यान युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने व श्री गोवर्धनी माता सेवा मंडळ चे अध्यक्ष मनोज बालम यांनी किल्ले बेलापूर यास नवसंजीवनी मिळून देण्यास लागेल ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. सदर शिवजयंती सोहळा-२०२२ यशस्वीरीत्या पार पाडण्यास किल्ले बेलापूर येथील मनोज भोईर, संतोष गोळे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अक्षय चव्हाण, सरचिटणीस सौरभ आहेर, खजिनदार सुदर्शन कौदरे, अजय बांदेकर, विशाल पिंगळे, बसवराज नंदी, अजिंक्य नवले, प्रसाद घरत, सौरभ बालम, प्रशांत शेलार आदी पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
