राज्यात कॅबिनेट विस्ताराचा फॉर्म्युला ठरला; शिंदे गटाने केली २० मंत्रीपदांची मागणी…मिळू शकतात ‘एवढी’ मंत्रिपदं
मुंबई, दि. २९ : महिनाभरापासून लटकलेला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होऊ शकतो. असे कळते की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गोटात एकमत झाले आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील आमदारांची मॅरेथॉन बैठक घेतली. सर्वांच्या सहमतीने मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.
त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे आपल्या आमदारांसोबत वन-टू-वन बैठक घेत होते, त्यात हा समझोता झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून २० मंत्रीपदांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर भाजपने १५ ते १८ मंत्रीपदे देण्याचे मान्य केले.
लवकरच होणार शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे लवकरच दिल्लीत येणार आहेत. यानंतर मंत्रिमंडळाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होईल. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असलेल्या शिंदे गटातील नेत्यांना मंत्रीपद मिळू शकते. काही नवीन चेहऱ्यांनाही मंत्रिपद मिळू शकते अशी माहिती मिळत आहे. ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार नाही, त्यांना महामंडळात अध्यक्षपद दिले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनाही राज्यपालांनी शपथ दिली. खरेतर, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी (MVA) सरकार अल्पमतात आले. तेव्हापासून शिवसेनेत खरी लढत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने निवडणूक आयोगाकडे ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता मिळावी यासाठी धाव घेतली आहे.
