जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांचे काम आता संपले आता आपण आपली भूमिका बजावण्याची वेळ आली : शरद पवार
मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा आता संपला आहे. निवडणुकीपूर्वी देशात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आलं. पण एकदा आपण ठामपणे ठरवलं तर प्रत्येक कार्यकर्ता ठामपणे उभा राहतो, हे या निवडणुकीने दाखवलं.”
पुढे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार आणि मित्रपक्षांचे आभार मानताना ते म्हणाले की, “हा इतिहास तुम्ही घडवलात याबद्दल सर्व कार्यकर्त्यांसह पक्षातील सर्वांचे आभार. आपल्या मित्रपक्षांची साथही आपल्याला मिळाली. त्यामुळे निवडणुकीत आपण निर्भेळ यश संपादन केले.”
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
१) अशी भरघोस साथ मिळते त्यावेळी त्यासोबत एक जबाबदारी येते. त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष म्हणून उत्तम कामगिरी आपल्याला पार पाडायची आहे.
२) आज राज्याची अवस्था बिकट झाली आहे. राज्यात अवकाळी पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक प्रकारची संकटं वाढली आहेत. कोल्हापूर-सांगली भागात पुरामुळे नुकसान झाले आहे. अशा अनेक प्रश्नांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे.
३) उद्योगधंद्याच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा नावलौकीक होता. मात्र आज राज्यात अनेक कारखाने बंद पडले आहेत. ६० टक्के कारखाने बंद आहेत. यामुळे हजारो कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. यासाठी संघर्ष करण्याची भूमिका आता घ्यावी लागेल.
४) यावेळेस तरुणांमध्ये एक उत्साह दिसला. मात्र बेरोजगारी वाढत असल्याने सामाजिक शांतता राखण्यासाठी तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याची गरज आहे.
५) आपण शहरी भागात मतदारांपर्यंत पोहचण्यास कमी पडलो आहोत. मुंबई शहरातील लोकांच्या दैनंदिन प्रवासाचा विचार केला तर दर दिवसाला ११ माणसे अपघातात मृत्युमुखी पडतात. अशा अनेक नागरी प्रश्नांकडे आपल्याला गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
६) राज्यातील अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांबाबत तुमचा-माझा परिचय सर्वसामान्यांशी व्हायला हवा. जनतेने आपल्याला निवडून दिले, त्यांचे काम आता संपले. आता आपण आपली भूमिका बजावण्याची वेळ आली आहे, आपल्याला समर्थपणे ती बजावायची आहे.
