कुठे ढोल ताशे आणि लेझीमच्या पथकासह तर कुठे मिकी माऊसच्या सानिध्यात मुलांची गावातुन मिरवणुक काढण्यात आली
बीड जिल्ह्यातही आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची कमालीची उपस्थिती होती. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थांचं फुलं, फूगे आणि नविन वर्षाची पुस्तकं देऊन स्वागत करण्यात आलं. नाशिक मध्ये सर्व शाळांना उत्साहात सुरुवात झाली. शाळेच्या प्रांगणात रांगोळ्या काढून, विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. मनपाच्या शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि गणवेश देण्यात आल्याचं शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सांगितलं. या शिवाय कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्यानं काही शाळांमध्ये तापमापकाद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी देखील करण्यात आल्याचंही पहायला मिळालं. कोरोनाच्या काळात शिक्षण विभागाने मुलांचं शिक्षण ऑनलाईन सुरू ठेवलं. आता प्रत्यक्ष शाळा सुरु होणार असल्याने शिक्षण विभागाने, बालकांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘पहिलं पाऊल’ या शाळापूर्व तयारी अभियानाचं राज्यात सर्वत्र आयोजन केलं आहे. या अभियानाच्या निमित्तानं औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहात बालकांचं पहिलं पाऊल अत्यंत दमदार पडेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
