संसदेत आजही गदारोळ; विरोधीपक्षातील खासदारांकडून काळे कपडे घालत निषेध
नवी दिल्ली, दि. २९: अदानी समूहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग १२ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काळे कपडे घालून निषेध केला आणि सभापतींच्या समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. राज्यसभेतही तीच स्थिती होती. सभागृहाची बैठक सुरू होताच काँग्रेसचे सदस्य सभागृहाच्या मध्यभागी आले आणि त्यांनी अदानी समूह प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली.
तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, अण्णा द्रमुक, आम आदमी पार्टी, डावे पक्षही त्यांच्या समर्थनात उतरले. काँग्रेस आणि द्रमुक सदस्यांनी काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. भारतीय लोकशाहीवरील वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी या मागणीचा सत्ताधारी सदस्यांनी पुनरुच्चार केला. गोंधळ सुरूच राहिल्याने सभापती जगदीप धनखड यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
Source – AIR
