श्री संगमेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी
उरण, दि.१(विठ्ठल ममताबादे): सालाबादप्रमाणे याहिवर्षी श्री संगमेश्वर देवस्थान ट्रस्ट देऊळवाडी, उरण शहर येथे माघ वद्य १३ शके १९४३ मंगळवार दि. १/३/२०२२ रोजी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे २ ते ४ दरम्यान रुद्राभिषेक, सकाळी १०:३० वा. चारफाटा साईमंदिर येथून पायी दिंडी आलेल्या साईभक्तांचे स्वागत, दुपारी २ ते ४ दरम्यान श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ बोकडविरा यांचे भजन, सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान इंचगिरी संप्रदाय गुरुभक्त वारकरी मंडळ उरण परिसराचे कीर्तनकार देवजी महाराज बाबर यांचे कीर्तन असे विविध धार्मिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिरासाठी रंगरंगोटी, सजावट, सभा मंडप, पताके आदीचे काम दरवर्षी सेवा म्हणून गोवारी कुटुंबीय करीत असतात.
वामन (बंटीशेठ) नामदेव गोवारी यांच्यापासून ही सेवा आजही मंदिरासाठी सुरु आहे. सुभाष गोवारी, देविदास गोवारी, जमनादास गोवारी, हेमदास गोवारी, प्रसाद गोवारी व गोवारी कुटुंबीय सर्व सामाजिक बांधलकीतून मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करतात. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी गणेश सुतार, देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ, देऊळवाडी युवक मंडळ, गोवारी कुटुंब, कोटनाका ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. ब्रिटिश कालीन व ऐतिहासिक असलेल्या शिवमंदिरात खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी गर्दी केली होती. भाविक-भक्तांनी शांततेत रांगेत उभे राहून शिस्तीने देवदर्शन घेतले.
