सांगली जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांना ‘या’ कारणामुळे ११ कोटी ७० लाख रुपयांचा दंड
सांगली: विनापरवाना ऊस गाळप केल्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या विश्वास आणि हुतात्मा किसन अहिर या दोन साखर कारखान्यांना एकूण ११ कोटी ७० लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही कारवाई केली. शिराळा इथल्या विश्वास कारखान्याला ७ कोटी ५७ लाख रुपये, तर वाळवा इथल्या हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याला ४ कोटी १३ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
विश्वास सहकारी साखर कारखान्यानं २८ ऑक्टोबर २०२१ पासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत १ लाख ५१ हजार ५४० टन उसाचं विनापरवाना गाळप केलं, तर हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याने २८ ऑक्टोबर २० २१ पासून ते १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ८२ हजार ६५० टन उसाचं विनापरवाना गाळप केलं. विनापरवाना गाळप केलेल्या उसावर ५०० रुपये प्रति टन याप्रमाणे दंड आकारला आहे.
