उपोषण मागे न घेण्याचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार
मुंबई, दि.२८: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल पुन्हा एकदा जाहीर केला. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावं, आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबतची कोंडी फुटावी, यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नाशी संबंधित मंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला संभाजीराजेंच्या प्रतिनिधींना देखील उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, कोल्हापूर इथल्या सकल मराठा समाजानं केला आहे.
दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्यास विविध पध्दतींनी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याची सुरुवात परवा बुधवारी कोल्हापूर बंदची हाक देऊन करण्याचा निर्णय काल कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले असून, हळदी बंदची हाक देत रस्ता रोको करण्यात येणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुळजापूर येथे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल लाक्षणिक उपोषण केलं.
