मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे
यासंदर्भात आज दिवसभरात छत्रपती संभाजीराजे यांच्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, अमित देशमुख यांच्यासह आझाद मैदानावरच छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट ३० जूनपर्यंत तयार करण्यात येणार असून रिक्त पदे १५ मार्चपर्यंत भरण्यात येतील. तसंच आठ उपकेंद्रांसाठी जमीन देखील देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
अण्णासाहेब पाटील महामंडळाला आणखी १०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळासह आणखी दोन महामंडळांवर पूर्ण वेळ व्यवस्थापक आणि कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या जिल्ह्यातल्या वसतिगृहांचं उद्धाटन गुढीपाडव्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात गृह मंत्रालय दर महिन्याला आढावा घेईल. यावर प्रकरणनिहाय विचार होईल. आंदोलनात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला एस टी महामंडळात नोकरी दिली जाईल. शासकीय सेवेत निवड झालेल्या पण न्यायालयाच्या निर्णयामुळे नियुक्तीपत्र न मिळू शकलेल्या मराठा उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अतिरिक्त पदं निर्माण करण्या संदर्भातला प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
