शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
रत्नागिरी, दि. १८: शिवसेना उपनेते व आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरी येथील निवासस्थानी व इतर ठिकाणी आज लाचलुचपत विभागाने धाड टाकली असून त्यांना अटकही करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साळवी यांच्या निवासस्थानी, त्यांचे लहान बंधू संजय साळवी यांच्या निवासस्थानी, जुन्या घरी तसेच रत्नागिरी बाजारपेठेत असलेल्या त्यांच्या हॉटेलवर एकाचवेळी एसीबी चे अधिकारी धडकले. हि बातमी बाहेर येताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना राजन साळवी म्हणाले कि कितीही दबाव टाकला तरी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही.
यावेळी ते म्हणाले कि, “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पावलं कुठे पडतात हे मला समजतं. त्यामुळे ते माझ्याकडे येणार आहेत, हे मला माहित होतं. ते रत्नागिरीतील अल्पायशी हॉटेलमध्ये उतरले होते. तिथून ते माझ्याकडे येणार असल्याचं मला माझ्या विश्वासूंनी सांगितलं होतं.” ते पुढे म्हणाले ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर राहिलो त्या दिवसापासून मी माझी मानसिकता केली होती की मला भविष्यात त्रास होणार. तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. त्यांच्याकडे अटक वॉरंट असून त्यांनी कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली नाही. आतापर्यंत माझ्या भावाची, त्याच्या पत्नीची, त्याची मुलं, माझी पत्नी, माझी दोन मुलं आणि व्यवसायासंबंधात चौकशी केली. आतापर्यंत मी एसीबी कार्यालयात सहा वेळा जाऊन सहकार्य केलं. मला माहित होतं ही मंडळी माझ्या घरापर्यंत येणार आहेत.
आज जवळपास ८ तास राजन साळवी यांची एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या दरम्यान त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेत नेण्यात आले होते. या ठिकाणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉकर ची झाडाझडती घेतली. आमदार राजन साळवी यांना पोलिसांच्या गाडीतून बँकेत नेण्यात येत असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळा घालत पोलिसांना अडवण्यास सुरुवात केली. यावेळी अखेर पोलिसांनी नमतं घेत साळवी यांना स्वतःच्या गाडीने येण्याची मुभा दिली. बँकेतून बाहेर पडताच राजन साळवी म्हणाले किबँक लॉकरची झडती घेऊन एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही.
उत्पन्नापेक्षा ११८ % संपत्ती जास्त असल्याचा आरोप ठेवत साळवी यांच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी म्हणून साळवींसह त्यांच्या पत्नी व मुलगा यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. गेल्या जवळपास दिड वर्षांपासून राजन साळवी व त्यांचे कुटुंबीय अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीनिमित्त फेऱ्या मारत असून अखेर राजन साळवी, त्यांच्या पत्नी व मुलगा यांच्या नावे अटक वॉरंट निघाल्यामुळे त्यांना अटक केली जाणार याची दाट शक्यता आहे. काल शिवसेना ठाकरे गटाचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना मुंबई महापालिका कोविड घोटाळाप्रकरणी ईडीकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती व आज आ. राजन साळवी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
