शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली; रुबी रुग्णालयात दाखल
पुणे, दि. २२: ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी उपचारानंतर घरी परतल्यानंतर पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शरद पवार यांना अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरांनी डिहायड्रेशनचे सौम्य लक्षण असल्याचे स्पष्ट केले असून सध्या त्यांना सलाईनद्वारे द्रवोपचार देण्यात येत आहेत. वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही. पुढील एक-दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीही त्यांना खोकला व छातीत कफ साचल्याचा त्रास झाल्याने बारामतीहून पुण्यात हलविण्यात आले होते. त्यावेळी पाच दिवस उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते पुण्यातील निवासस्थानी विश्रांती घेत होते. मात्र, पुन्हा अशक्तपणा जाणवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालय प्रशासनाकडून पुढील प्रकृतीविषयक अद्ययावत माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
