म्हणाले सरकार पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल….
मुंबई, दि. १४: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण आज १७ व्या दिवशी अखेर मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकार्यांसह जालन्याच्या अंतरवाली सराटी गावातील आंदोलनस्थळाला समक्ष भेट दिली. यावेळी आपण पुकारलेले उपोषण मागे घेत असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना स्वतःहाच्या हाताने ज्यूस पाजला. या सार्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट लिहीत आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
आपल्या फेसबूक पोस्ट मध्ये राज ठाकरे म्हणाले की, “श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.”
पुढे ते म्हणतात की, “आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे. गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा.”
यावेळी शिंदे सरकारला अप्रत्यक्ष कानपिचक्या देत ते म्हणाले की, “सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.”
