महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचं विजयादशमी मेळाव्यात प्रतिपादन
नागपूर, दि. ५ : महिलांना समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्यांना स्वत:चे निर्णय घेऊ दिले पाहिजे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरात रेशीमबाग मैदानावर पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आणि पद्मश्री संतोष यादव यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. आपल्या भाषणात भागवत यांनी, नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती, अर्थव्यवस्था, धार्मिक हिंसाचार या सर्व मुद्यांवर भाष्य केलं. देशातले विद्यार्थी हे देशभक्त आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन संस्कारासोबतच घरातले तसंच सामाजिक संस्कार होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि नफेखोरीमुक्त अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असं संघाने सरकारला सुचवल्याचं भागवत यांनी सांगितलं. सरकारने उद्योगशीलतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं. जे सनातन संस्कृतीत जीवन जगतात त्यांच्यामध्ये सृजन भाव निर्माण होतो, ही संस्कृती चांगल्या आरोग्यासाठी प्रेरित करते असं मत पद्मश्री संतोष यादव यांनी यावेळी व्यक्त केलं.
