गांधीनगर सत्र न्यायालयाने आज सुनावली शिक्षा
गांधीनगर, दि. ३१: गांधीनगर सत्र न्यायालयाने आज मंगळवार ३१ जानेवारी रोजी महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काल सोमवारी (३० जानेवारी) न्यायालयाने आसारामला (आसाराम बापू) महिला शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई हे यापूर्वीच बलात्काराच्या इतर प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
२०१३ मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसारामच्या पत्नीसह अन्य सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आसारामने २००१ ते २००६ दरम्यान महिलेवर अनेक वेळा बलात्कार केला, जेव्हा ती शहराच्या बाहेरील आश्रमात राहत होती.
ऑक्टोबर २०१३ मध्ये, सूरतस्थित एका महिलेने आसाराम आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदेशीर कैदेत ठेवल्याचा आरोप केला होता. खटला सुरू असताना एका आरोपीचा मृत्यू झाला. जुलै २०१४ मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आसाराम सध्या राजस्थानच्या जोधपूर तुरुंगात दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात बंद आहे.
