राष्ट्रपती राम नाथ कोविंद चार दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर; मुंबईत आगमन
मुंबई, दि.६: भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आदींनी त्यांचे स्वागत केले.

यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टरने रायगडकडे प्रयाण झाले.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. पुण्यामध्ये लोहगाव इथल्या भारतीय वायुसेनेच्या तळावर उद्या होणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांना राष्ट्रपती उपस्थित राहतील तसंच हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधतील. त्यांनतर बुधवारी ८ डिसेम्बर रोजी मुंबईत भारतीय नौदलाच्या ‘ट्वेन्टी सेकंड मिसाईल स्क्वॉड्रन’ला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंट स्टॅंडर्डनं सन्मानित केलं जाणार आहे. मुंबई नौदल गोदीत होणाऱ्या या समारंभाला राज्यपाल, मुख्यमंत्री, नौदल प्रमुख आणि अन्य अधिकारी तसंच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
