कोलोरॅडो मराठी मंडळाकडून दिवाळी उत्साहात साजरी
कोलोरॅडो, दि. ३०: अमेरीकेतील कोलोरॅडो मराठी मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त खास लहान मुलांनी रामायण सादर केले. या रामायणात वय वर्षे ३ ते १० वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग घेतला.
या रामायणातील भाषा मुलांना समजायला आणि बोलायला कठिण जाऊ नये म्हणुन या स्किटच्या दिग्दर्शिका पल्लवी माने यांनी सोप्या शब्दात संवादलेखन केले. तसेच मुलांकडून संवादाचे रेकॉर्डिंग करून घेतले.

ऑडियो रेकॉर्डिंग आणि बॅकग्राउंड म्युझिक यासाठी तंत्रज्ञ म्हणुन राम पडते यांनी काम पाहिले. तर प्रकाश योजनेचे काम तेजश्री जाधव यांनी पाहिले. या रामायणात तेरा मुलांनी भाग घेतला आणि राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, जटायु, हरिण, वानरसेना, खारुताई, नगरवासी अशी पात्रे साकारली. भारतातून खास राम लक्ष्मण यांचे कपडे मागवण्यात आले होते. रामायणात भूमिका साकारलेल्या ओवी सप्रे, श्रावी गुलाबे, केतकी जगदाळे, आर्या नानकानी, श्लोक पडते, इशिका ठाकरे, निहान माने, स्वरश्री घोडके, अंश बोरसे, युग बोरसे, शिवांक मोरे, विहानी कुमार, अन्वी गुप्ता या सर्व बालकलाकारांना कोलोरॅडो मराठी मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्र देवून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. अमेरिकेतील एक प्रमुख महाराष्ट्र मंडळ असलेल्या ‘कोलोरॅडो मराठी मंडळा’कडून गणेशोत्सव, नवरात्री पासून ते मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्या पर्यंतचे सर्व सण अगदी उत्साहात साजरे केले जातात.
याच सोबतीला मंडळातर्फे कोलोरॅडो येथे नोकरी-व्यवसाया निमित्त स्थायिक असलेल्या मराठी समुदायात मराठी भाषा, भारतीय संस्कृती रुजावी या अनुषंगाने विविध उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाते.
