राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माध्यमांना माहिती
अयोध्या, दि. २०: राम मंदिराचे दरवाजे जनतेसाठी कधी उघडणार या प्रश्नाच्या उत्तराबाबत अनेक अटकळी बांधल्या जात आहेत. या सगळ्या दरम्यान, राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की, “१५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान, राम मंदिराचा अभिषेक केला जाऊ शकतो”.
नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील, असे ते म्हणाले. मिश्रा म्हणाले की, २४ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा पाहण्याची व्यवस्था सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाईल, त्यावर सोन्याचे नक्षीकाम असेल, असे त्यांनी सांगितले. मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरही सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मंदिराची पायाभरणी होईल तेव्हाच अयोध्येला जाईन, असे पंतप्रधानांच्या मनात होते, म्हणूनच ते ५ ऑगस्ट २०२१ रोजी येथे आले होते.
