अंधेरी येथील सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणाबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे निवेदन
मुंबई, दि. १ : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात मराठी जनांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यपाल कोश्यारींवर सर्व बाजूंनी टीका होत होती. या संबंधी त्यांनी ३० जुलै रोजी एक निवेदन प्रसिद्ध करत आपली बाजू मंडली होती. परंतू त्यांच्या विधांनांमुळे उठलेलं वादळ काही केल्या क्षमण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर आज त्यांनी आपला माफीनामा सादर करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
वाचा नेमकं काय म्हणाले आहेत कोश्यारी आपल्या माफीनाम्यात
“दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.”
