“कोरोना स्थिती बाबत राज्यात घाबरण्यासारखी स्थिती नाही” – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.२०: कोरोना स्थिती बाबत राज्यात घाबरण्यासारखी स्थिती नाही असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. ते केंद्र सरकारनं राज्याला दिलेल्या पत्राच्या संदर्भात प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते. केंद्र सरकारनं काही राज्यांचा उल्लेख करुन सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. आपण स्वतः राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही १३५ आहे.
आपल्या राज्यानं दररोजच्या ४० ते ६० हजार केसेस पाहिल्या आहेत. त्यामुळे सध्याची स्थिती अजिबात घाबरण्यासारखी नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सहव्याधी असलेल्या किंवा वृद्ध लोकांनी खाजगी दवाखान्यांमध्ये जाऊन वर्धक मात्रा घ्यावी असंही ते म्हणाले. आपण राज्यात सर्व निर्बंध हटवलेले आहेत. मास्कही आता अनिवार्य नाही. ज्यांना वाटेल त्यांनी तो धारण करावा असंही त्यांनी सांगितलं.
