सध्या लॉकडाउनचा विचार नसला तरी निर्बंध अधिक कडक करण्यासाठी तयारी सुरू – राजेश टोपे
राज्यात कोविड १९ च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनचा विचार नसला तरी निर्बंध अधिक कडक करण्यासाठी काम सुरू आहे असं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कोविडरुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मात्र, सातशे मेट्रिक टनापेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज निर्माण झाली, तर लॉकडाऊनचा विचार सरकार करेल, असं ते म्हणाले.
ओमायक्रॉन आणि डेल्टाच्या चाचण्यांसाठी जिनॉम सिक्वेन्सिंग सॅंपल किट खूप महाग आहे तरीही त्याची एक तरी प्रयोगशाळा असावी यासाठी प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. लसीकरण हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय असून त्यामुळे बनावट लसीकरणाची वाढती प्रकरणं हाही केंद्राचा विषय असल्यांचं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कोविड बाधितांची संख्या वाढत राहिली, तर राज्य सरकार अधिक कठोर निर्बंध घालू शकतं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कालच नाशिक इथं सांगितलं होतं. राज्यातले दहा मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. सरकारनं जारी केलेली नियमावली लागू झाली असून, लोकप्रतिनिधींसह नागरीकांनी देखील नियमांचं पलन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
