जाणून घ्या नेमकी काय आहे दुर्बल घटकांच्या विकासासाठी आणलेली राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासन पुरोगामी विचारधारा घेऊन समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. या दुर्बल घटकांचा विकास करायचा असेल तर समाजातील मुला-मुलींना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत. फक्त शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचाविण्यासाठीही योजना राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यादिनानिमित्त जाणून घेऊया राज्य शासनातर्फे देण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेबद्दल…..
राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून रहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना 11 जून 2003 पासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी इयत्ता 10 वीमध्ये 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवून इयत्ता 11 वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग आणि व्हीजेएनटीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी व 12 वीमध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी आहे.
11 वी आणि 12 वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध, मागास प्रवर्ग आणि व्हीजेएनटीच्या मुला-मुलींसाठी 10 महिन्यासाठी तीन हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे सहाय आयुक्त किंवा संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधला तर अर्ज करण्याची प्रक्रिया समजून येते. सध्या महाडीबीटी ऑनलाईन वेबपोर्टलवर शिष्यवृत्तीची प्रक्रिया सुरू असल्याने थेट लाभ विद्यार्थ्यांना होत आहे.
