…..तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही : राज ठाकरे
ठाणे: राज्यातल्या स्थानिक मुला-मुलींना जर नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही. राज्य सरकारने आरक्षण प्रकरणी या तरुणांची फसवणूक तसेच मराठा समाजाची दिशाभूल केला आहे असा आरोप आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला.
दुष्काळाच्या विषयावरूनही राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. जर पाटबंधारे विभागाने कामं केली असतील तर २९ हजार गावं दुष्काळग्रस्त म्हणून का घोषित करण्यात आली? दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे निधी असताना सुद्धा ते तो का खर्च करत नाहीत? अशा प्रश्नांनी त्यांनी सरकारला धारेवर धरलं.
टँकर लॉबी बद्दल बोलताना ते म्हणाले की टँकर लॉबी कोणाची आहे? कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, हे तपासा आम्हीही तपासतोय. टँकर लॉबीला राजकारण्यांनाकडून धंदा करण्यासाठी रान मोकळं करून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
